गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१९

मातंग समाजाच्या संदर्भात महाराष्ट्रातील जैन समाजाला आवाहन

-महावीर सांगलीकर 
8149703595

महाराष्ट्रातील मातंग समाजाबद्दल आपण ऐकून असलाच. हा समाज संख्येने खूप मोठा आहे आणि महाराष्ट्राबाहेरही कर्नाटक, तेलंगण व इतर प्रदेशात गावोगावी पसरला आहे. हा समाज प्राचीन व अतिप्राचीन काळी आणि मध्ययुगापर्यंत जैन धर्माचा अनुयायी होता. परंतु काळाच्या ओघात हा समाज जैन धर्मापासून दूर गेला. आता या समाजातील अनेक लोकांना आपले पूर्वज जैन होते याची जाणीव झाली आहे आणि असे लोक पुन्हा जैन धर्माकडे आकर्षित झाले, होत आहेत. 

मातंग समाजबांधवांचे जैन धर्मात स्थितिकरण व्हावे यासाठी या समाजातले एक ज्येष्ठ व प्रसिद्ध लेखक,  सामाजिक कार्यकर्ते श्री. विठ्ठल साठे यांनी पुढाकार घेतला आहे. श्री विठ्ठल साठे हे भारतीय मातंग युवक संघटनेचे संस्थापक आणि मार्गदर्शक आहेत. त्यांनी स्वत: जैन तत्वज्ञानाचा आणि जैन धर्माचा सखोल अभ्यास केला आहे व आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसह जैन धर्म स्वीकारला आहे. 

श्री. विठ्ठल साठे यांनी मातंग समाजामध्ये जैन विचार आणि आचार यांचा प्रसार होण्यासाठी जैन विचार मंच ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेने गेल्या तीन वर्षात 200 हून अधिक मातंग कुटुंबांचे जैन धर्मात स्थितीकरण केले आहे. त्यांच्यामागे त्यांच्या कार्यकर्त्यांची भक्कम फौज उभी आहे, शिवाय जैन समाजातील अनेक कार्यकर्तेही त्यांच्या सोबत आहेत. या संस्थेच्या प्रसारामुळे मातंग समाजात आता महावीर जयंती, पर्युषण पर्व, अक्षय तृतीया असे जैन सण साजरे होऊ लागले आहेत. सातारा जिल्ह्यातील निढळ या गावी मातंग समाज एक जैन मंदिरही बांधत आहे. 

मातंग समाजाचे त्यांच्या मूळ धर्मात स्थितीकरण होण्याला बळ मिळावे आणि वेग यावा यासाठी जैन समाजाने देखील कांही पाउले उचलणे गरजेचे आहे. 

जैन समाजाने केलीच पाहिजे अशी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मातंग समाजातील ज्यांनी जैन धर्मात पुनरागमन केले आहे, त्यांना आपले धर्मबंधू म्हणून स्वीकारले पाहिजे. दुसरी करण्यासारखी गोष्ट म्हणजे जैन समाजाने त्यांना आपल्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सामावून घेतले पाहिजे. या दोन अतिशय साध्या व सोप्या पण महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या केल्यामुळे स्थितीकरणाच्या या चळवळीला मोठे बळ मिळेल. 

मातंग समाजाचे एक मोठे वैशिष्ठ्य म्हणजे हा कष्टाळू आणि प्रामाणिक समाज आहे. या समाजात गायक, वादक आदी कलाकारही मोठ्या प्रमाणात आहेत. जैन समाजाने मातंग समाजातील कलाकारांना आपल्या कार्यक्रमात शक्य तिथे संधी द्यायला पाहिजे. या समाजातील व्यावसायिकांशी व्यावसायिक संबंध वाढवायला पाहिजेत. 

जैन समाजाने वरील गोष्टी केल्या तर ती एक ऐतिहासिक महत्वाची गोष्ट ठरणार आहे!

लक्षात ठेवा, हे मातंग समाजाचे धर्मांतर नव्हे, तर घरवापसी आहे. मातंग समाजाच्या जैन इतिहासाबद्दल मी लिहिलेला मातंग वंश आणि जैन परंपरा हा लेख पुढील लिंक वर अवश्य वाचावा. https://matangvansh.blogspot.com/2019/10/blog-post_11.html 

या संदर्भात तुमचे कांही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला फोन करून विचारू शकता.

धन्यवाद! 

हेही वाचा:

व्हिडिओ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Popular Posts