रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९

जैन साहित्यात मातंग: अभयकुमार आणि मातंगपतीची गोष्ट

-महावीर सांगलीकर


भगवान महावीरांच्या काळात श्रेणिक बिम्बिसार नावाचा राजा होऊन गेला. या राजाची चेलना नावाची आवडती राणी होती. ही चेलना राणी भगवान महावीर यांची मावशी होती. श्रेणिक व चेलना यांना अभयकुमार नावाचा मुलगा होता. अभयकुमार हा अतिशय हुशार आणि चाणाक्ष होता.

एकदा श्रेणिक राजाने चेलना राणीसाठी एक खास महाल बांधण्याचे ठरवले. त्यानुसार अभयकुमारने सर्व सुखसोयी असणारा एक विशाल महाल बांधवून घेतला. अभयकुमारने या महालाभोवती एक बगीचाही बनवून घेतला. या बगीच्यामध्ये बाराही महिने फळे देणारी विशेष झाडे होती.

त्या भागात मातंग लोक मोठ्या संख्येने होते. मातंगपती हा या समाजाचा प्रमुख होता. त्याला अनेक प्रकारच्या गुप्त विद्या येत असत. तो अगदी अदृश्यही होऊ शकत असे.

एकदा मातंगपतीची बायको गरोदर असताना तिला आंबे खायची इच्छा झाली.  तिने आपल्या पतीला आंबे आणण्याची मागणी केली. त्यावेळी आंब्याचा मोसम नव्हता, त्यामुळे मातंगपतीने तिला समजावले. तेंव्हा तिने त्याला सांगितले की चेलना राणीच्या महालाभोवती असलेल्या बागेत आंब्याचे एक झाड आहे आणि त्याला बाराही महिने आंबे लागतात. तुम्ही तिथून आंबे घेऊन यावेत.

बायकोच्या आग्रहामुळे मातंगपतीने त्या बागेत जाऊन आंबे आणायचे ठरवले. 

त्या महालाभोवती रक्षक असायचे. पण मातंगपतीकडे अदृश्य होण्याची विद्या होती. तिचा वापर करत अदृश्य होऊन रात्रीच्या वेळी त्याने कुणालाही  न कळता त्या बागेतील झाडांचे कांही आंबे तोडले आणि आपल्या बायकोला आणून दिले.

दुसऱ्या दिवशी सकाळी चेलना राणी बागेत फिरत असता तिच्या लक्षात आले की झाडांचे आंबे कमी झालेले आहेत. तिने माळ्याला व रक्षकांना झाडांवर नीट लक्ष ठेवायला सांगितले.

दुसऱ्या दिवशी रात्रीही मातंगपती अदृश्य रूपाने बागेत आला आणि झाडांचे कांही आंबे तोडून घरी घेऊन गेला. सकाळी माळ्याच्या लक्षात आले की झाडाचे आंबे पुन्हा कमी झाले आहेत. त्याने राणीला सांगितले की त्याने बागेत येताना व जाताना कोणालाच पाहिले नाही, तरीही झाडाचे आंबे पुन्हा कमी झाले आहेत. राणीला हे पटले नाही. तिने झाडावर बागेवर नजर ठेवण्यासाठी आणखी कांही रक्षकांची नियुक्ती  केली.

पण झाडाचे आंबे गायब होतच राहिले. मग राणीने ही गोष्ट राजाच्या कानावर घातली. राजा ही गोष्ट ऐकून भयंकर रागावला आणि त्याने अभयकुमारवर चोराला पकडण्याची जबाबदारी सोपवली. त्यानुसार त्या रात्री अभयकुमारने बागेवर स्वत: नजर ठेवली. पण त्यालाही रात्री बागेत कोणी आलेले दिसले नाही. पण सकाळी त्याला झाडाचे आंबे कमी झालेले दिसले. त्यामुळे त्याने दुसऱ्या रात्री त्या झाडाजवळ उभे राहायचे ठरवले. तसा तो उभा असताना रात्री त्याला दिसले की झाडाची एक फांदी वाकत आहे आणि तिच्यावरचे आंबे तोडले जात आहेत. त्याच्या पटकन लक्षात आले की हे एखाद्या अदृश्य व्यक्तीचे काम आहे.

त्यानंतरच्या रात्री अभय कुमारच्या सूचनेनुसार अनेक रक्षक बगीच्यात लपून बसले आणि झाडाची फांदी वाकताच त्यांनी त्या झाडाला घेराव घातला.

मातंगपती अदृश्य असला तरी त्याला रक्षकांच्या गराड्यातून बाहेर पडता येईना. तेंव्हा तो प्रकट झाला. त्याला अटक करण्यात आली आणि राजापुढे हजार  करण्यात आले. राजा भयंकर रागावला होता व तो मातंगपतीला देहदंडाची शिक्षा देणार होता. पण मातंगपतीच्या अदृश्य होण्याच्या कलेचे  महत्व अभयकुमारच्या लक्षात आले  होते व ही कला राज्याच्या हितासाठी कशी वापरता येईल याचा तो विचार करत होता. त्याने ही माहितीही काढली होती की मातंगपती हा कांही सराईत चोर नव्हता, तर आपल्या बायकोची आंबे खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो आंबे चोरत होता. त्यामुळे अभयकुमारच्या मनात मातंगपतीविषयी राग नव्हता. उलट दयाभाव होता. त्यामुळे अभयकुमारने मातंगपतीला वाचवायचे ठरवले होते. त्यासाठी त्याने एक योजनाही आखली होती.

अभयकुमारने राजाला सांगितले की मातंगपतीला शिक्षा सुनावण्यापूर्वी तुम्ही त्याच्याकडे असलेली विद्या शिकून घ्यावी. त्या विद्येचा तुम्हाला आणि राज्याला फायदा होईल. अभयकुमारची ही सूचना राजाला पटली व त्याने मातंगपतीला ती विद्या शिकवण्याची आज्ञा केली. मातंगपतीला ही आज्ञा पाळण्यावाचून गत्यंतर नव्हते.

मातंगपतीला राजाच्या महालात आणले गेले. तिथे राजा त्याच्या सिंहासनावर बसला होता, तर मातंगपती त्याच्यासमोर उभा होता. मातंगपतीने राजाला आपली विद्या शिकवायला सुरवात केली. पण राजाच्या डोक्यात कांही शिरेना. त्याला वाटले मातंगपती आपल्याला नीट शिकवत नाही. त्याने मातंगपतीला तसे बोलूनही दाखवले.

तिथे उभे असलेल्या अभय कुमारच्या लक्षात कांही गोष्टी आल्या. त्याने राजाला सांगितले की मातंगपतीने सांगितलेले तुम्हाला कळेना आणि कळणार ही नाही, कारण तुम्ही मातंगपतीला योग्य तो मान देत नाही. आत्ता मातंगपती तुमचा गुरु आहे आणि तुम्ही गुरूबरोबर शिष्याने जसे वागायला पाहिजे तसेच वागायला पाहिजे.

राजाला त्याची चूक कळली. त्यामुळे तो आपल्या सिंहासनावरून उठला आणि मातंगपतीला  मोठ्या आदराने सिंहासनावर बसवले. राजा त्याच्या समोर एखाद्या विद्यार्थ्याने उभे राहावे तसा उभा राहिला.
त्यानंतर मातंगपतीने त्याला जे शिकवले ते तो लगेच शिकला.

त्यानंतर राजाने अभयकुमारला विचारले, याला आता कोणती शिक्षा द्यायची? त्यावर अभयकुमार म्हणाला, मातंगपती हा तुमचा गुरु आहे. तुम्ही गुरूला शिक्षा कशी करू शकता? तुम्ही मातंगपतीला गुरुदक्षिणा दिली पाहिजे!

राजाला हे पटले व त्याने मातंगपतीला मुक्त केले.

या कथेतून पुढील गोष्टी लक्षात येतात:
मगध भागात भगवान महावीरांच्या काळात मातंग नावाचा समाज होता.
मातंगपतीला कांही विशेष विद्या येत होत्या, यावरून मातंग हे विद्याधर होते या मताला आणखी पुष्टी मिळते.

हेही वाचा:

व्हिडिओ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Popular Posts