रविवार, १५ सप्टेंबर, २०१९

प्राचीन भारतातील प्रमुख पौराणिक वंश, मातंग वंश आणि जैन धर्म

-महावीर सांगलीकर 


प्राचीन भारतातल्या जैन आणि वैदिक परंपरेतील विविध साहित्यात, पुराणांमध्ये अनेक वंशांचा उल्लेख आढळतो. हे वंश म्हणजे Race या इंग्रजी शब्दाच्या अर्थाचे नव्हेत, तर एखाद्या व्यक्ती पासून सुरु झालेल्या घराण्याच्या अर्थाचे आहेत. अशा प्रमुख वंशांची नावे पुढील प्रमाणे आहेत: 

1. सामान्य वंश 2. इक्ष्वाकु वंश 3. उग्र वंश उर्फ नागवंश (शेषवंश) 4. ऋषि वंश 5.  कुरु वंश 6. चन्द्र वंश 7.  नाथ वंश 8.  भोज वंश 9. मातंग वंश 10. यादव वंश 11. रघुवंश 12. राक्षस वंश 13. वानर वंश 14. विद्याधर वंश 15. श्रीवंश 16. सूर्य वंश 17. सोम वंश 18. हरिवंश  (यातील चंद्रवंश आणि सोमवंश हे एकच आहेत). 

वर दिलेल्या वंशांबरोबरच इतरही कांही वंश असतील पण हे 18 वंश विशेष प्रसिद्ध आहेत. वरील वंशांशिवाय इतर अनेक ऐतिहासिक राज्यवंश आहेत. उदा. मौर्य वंश, शिशुनाग वंश, गुप्त वंश आदी. पण या लेखात मी केवळ पौराणिक वंशांचा विचार केला आहे.

वरील सर्वच वंशांचा संबंध जैन धर्माशी आलेला दिसतो. उदा. जैन साहित्यानुसार इक्ष्वाकू वंश हा जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांच्यापासून सुरु झाला तर सोमवंश ऋषभपुत्र बाहुबली आणि सुर्यवंश ऋषभपुत्र भारतापासून सुरु झाला. मातंग वंश ऋषभदेवांचा नातू विनमी याचा मुलगा मातंग याच्यापासून सुरु झाला. मातंग वंशात 7 वे तीर्थंकर सुपार्श्वनाथ झाले. यादव वंशात जैन धर्माचे 22 वे तीर्थंकर नेमिनाथ झाले. हे नेमिनाथ श्रीकृष्णाचे चुलत बंधू होते. उग्र वंशात 23 वे तीर्थंकर पार्श्वनाथ झाले. नाथ वंशात भगवान महावीर झाले. विद्याधर वंशाचा जैन साहित्यात जागोजागी उल्लेख आढळतो. इतरही वंशांचा जैन धर्माशी या ना त्या प्रकारे संबंध आलेला दिसतो. 

विशेष म्हणजे आजच्या घडीला वर दिलेल्या पौराणिक वंशांपैकी केवळ पाचच वंश अस्तित्वात आहेत. ते म्हणजे सोमवंश, सुर्यवंश, नागवंश, यादव वंश आणि मातंग वंश. यातही पहिल्या तीन वंशांचे त्याच नावाने ओळखले जाणारे लोक अस्तित्वात नाहीत. पण यादव आणि मातंग या नावाने ओळखले जाणारे लोक (समाज) आजही अस्तित्वात आहेत. कांही समाज स्वत:ला सोमवंशी, सूर्यवंशी, नागवंशी वगैरे म्हणवून घेत असले तरी ती त्यांची अधिकृत ओळख नाही. पण यादव आणि मातंग लोक त्यांच्या याच नावाने ओळखले जातात.

आज प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या या यादवांचा आणि मातंगांचा जैन धर्माशी फार जवळचा संबंध आहे. त्याबद्दल मी नंतर विस्ताराने लिहीन.

हेही वाचा:

व्हिडिओ


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Popular Posts