गुरुवार, २३ जून, २०२२

उपेक्षितांसाठी जैन धर्मच जास्त योग्य

-महावीर सांगलीकर

jainway@gmail.com


दलित, आदिवासी, भटके, विमुक्त यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्यात अनेक अडचणी आहेत, आणि ज्यांनी तो स्वीकारला आहे त्यांना त्या धर्माचा फारसा उपयोग झाला नाही. कारण कांही दलित समूहांचे झालेले बौद्ध धर्मांतर एक राजकीय धर्मांतर आहे. त्याचा बौद्ध धर्माचे तत्वज्ञान, आचरण याच्याशी कांहीही संबंध नाही. या धर्मांतरावर हिंदू धर्माविषयी राग, सूडबुद्धी यासारख्या नकारात्मक भावनांचा प्रभाव आहे. धर्मांतरीत बांधवांची सगळी शक्ती हिंदू धर्म कसा वाईट आहे हे सांगण्यातच वाया चालली आहे. बौद्ध चळवळीला राजकीय स्वरूप आल्याने आणि ही चळवळ नकारात्मक शक्तीच्या ताब्यात गेल्याने तिला कसलेही चांगले भवितव्य दिसत नाही. अशा अवस्थेत उपेक्षितांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी जैन धर्म हाच सगळ्यात उत्तम पर्याय आहे.

दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की प्रस्थापित नवबौद्ध आणि इतर दलित जाती यांच्यात फारसे सख्य नसल्याने इतर दलित जाती बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या बाबतीत उदासीन आहेत. याचे एक उदाहरण म्हणजे उत्तर भारतात चांभार समाजाने बौद्ध धर्म स्वीकारण्या ऐवजी आपला वेगळा रोहीदासिया हा धर्म स्थापन केला. अगदी कट्टर आंबेडकरवादी असणा-या कांशीराम, मायावती यांनी देखील बौद्ध धर्म स्वीकारण्याचे टाळले.

उपेक्षितांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी जैन धर्म हाच सगळ्यात उत्तम पर्याय आहे ही केवळ थेअरी नाही, तर ती प्रत्यक्षात सिद्ध झालेली गोष्ट आहे. गेल्या सुमारे ७०-८० वर्षात राजस्थान, मालवा, मध्य प्रदेश या भागात मेघवाल, बलाई, खाटिक या दलित जातींतील मोठ्या समूहाने जैन धर्म स्वीकारला आणि आपली धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगती करून घेतली आहे. गुजरातमधील पंचमहाल व इतर अनेक जिल्ह्यातील लाखो आदिवासींनी जैन धर्म स्वीकारून वरीलप्रमाणेच आपली प्रगती साधून घेतली आहे. अशीच गोष्ट झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल येथील ज्या आदिवासी समूहांनी जैन धर्म स्वीकारला आहे त्यांच्या बाबतीतही घडली आहे.

या प्रगतीमागे या धर्मांतरीत लोकांना जैन आचरणाचे करावे लागणारे पालन ही गोष्ट मुख्य आहे. जैन धर्मात एकांगी विचारांना अजिबात थारा नाही, त्यामुळे हे लोक विनाकारण संघर्ष, तोडफोड, दुस-यांविषयी तुच्छ्ताभाव, अतिरेकी टीकाखोर स्वभाव, आपल्या जातीचा अतिरेकी अभिमान यापासून आपोआपच दूर रहातात. वर म्हंटल्याप्रमाणे भारतातील बौद्ध धर्मांतर हे राजकीय धर्मांतर असल्याने त्यात हे शक्य नाही. तेथे बौद्ध धर्म प्रत्यक्ष स्वीकारण्यापेक्षा धर्मांतराच्या बातम्यांना मोठे महत्व देण्यात येत आहे.

बौद्ध धर्माबद्दल मला आपुलकी आहे, पण या धर्माची राजकारणापासून फारकत झाल्याशिवाय या धर्माला भवितव्य नाही, आणि सध्यातरी या धर्माची बामसेफी राजकारणापासून सुटका करणे अवघड आहे. बौद्ध धर्माचा दुरुपयोग करत दलित-आदिवासींच्या भावना भडकावण्याचे काम करणा-या अतिरेकी शक्तीपासून दलित आणि आदिवासी यांना, देशाला आणि खुद्द बौद्ध धर्माला वाचवायचे असेल तर आज दलित आणि आदीवासी यांच्यासाठी जैन धर्म हाच सगळ्यात उत्तम पर्याय आहे.

हेही वाचा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Popular Posts