गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

जैन परंपरेत मातंग: श्रवणबेळगोळ येथील मंगाई बसदी (मंगाई जैन मंदिर)


-महावीर सांगलीकर 


दक्षिण कर्नाटकातील हसन जिल्ह्यात वसलेले श्रवणबेळगोळ हे एक जगप्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्राला सुमारे 2300 वर्षांचा इतिहास आहे. इथे इंद्रगिरी आणि चंद्रगिरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दोन मोठ्या टेकड्या आहेत. इंद्रगिरीवर भगवान बाहुबलींची 58 फूट उंचीची एकाच पाषाणातील सुंदर मूर्ती आहे. ही मूर्ती दहाव्या शतकाच्या उत्तरार्धात घडवली गेली आहे. इंद्रगिरीच्या समोर असलेल्या चंद्रगिरीवर सम्राट चंद्रगुप्त आणि त्यांचे गुरु भद्रबाहू यांच्या समाध्या आहेत. या टेकडीवर अनेक प्राचीन जैन मंदिरे आहेत.

याशिवाय या टेकडीवर इतर अनेक राजे, राण्या, सेनापती, श्रावक यांच्याशी संबधित शेकडो शिलालेख आहेत.

या दोन टेकड्यांच्यामध्ये असणाऱ्या श्रवणबेळगोळ या गावात आणि परिसरातही अनेक जैन मंदिरे आहेत. यापैकी एक मंदिर मंगाई बसदी या नावाने ओळखले जाते. कन्नड भाषेत बसदी म्हणजे मंदिर.



श्रवणबेळगोळच्या मंगाई नावाच्या एका महिलेने हे मंदिर बांधले म्हणून या मंदिराला मंगाई बसदी म्हणतात.

ही मंगाई त्यावेळची एक प्रसिद्ध महिला होती. ती  त्यावेळच्या चारुकीर्ती पंडिताचार्य यांची शिष्या होती. ती मंदिरे आणि राज दरबारात नृत्य करणाऱ्या राजनर्तिकांची प्रमुख होती. तिला राजदरबारात आणि धार्मिक क्षेत्रात मोठा मान होता. तिला त्रिभुवन चूडामणी ही पदवी देऊन गौरवण्यात आले होते.

मंगाई बसदीमध्ये भगवान शांतीनाथ यांची साडेचार फूट उंचीची सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीची प्रतिष्ठापणा विजय नगर साम्राज्याची राणी भीमादेवी हिच्या हस्ते करण्यात आली होती. मंदिराच्या बाहेर दगडात कोरलेले दोन हत्ती आहेत. या बसदीची स्थापना इसवी सन 1325 मध्ये करण्यात आली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Popular Posts