शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

दलित-आदिवासींचे जैन धर्मांतर

-महावीर सांगलीकर

गेल्या सुमारे 80 वर्षांच्या काळात उत्तर भारतात दलित-आदिवासींच्या कांही समूहांनी फार मोठ्या प्रमाणावर जैन धर्म स्वीकारला आहे आणि ही प्रक्रिया आजही चालू आहे, हे फारसे कोणाला माहीत नाही. याचे कारण म्हणजे हे सामुहिक धर्मांतर नाही आणि या  धर्मांतराचा कोठेही गाजावाजा केला जात नाही.

दलित-आदिवासींच्या या धर्मांतराची माहिती घेण्याअगोदर आपणास ही गोष्ट माहीत असणे गरजेचे आहे की भारतात आज जे अनेक दलित-आदिवासी-मागासवर्गीय समाज आहेत, त्यातील अनेक समूह हे एकेकाळी जैन धर्माचे अनुयायी होते. असे समूह भारतभर पसरले आहेत आणि एकेकाळी त्यांचा जैन धर्माशी असलेला संबंध अनेक साहित्यिक, शिलालेखिय व इतर पुरावे देवून सिद्ध करता येतो. त्याविषयी मी वेगळा लेख लिहित आहे. असो.

दलित आदिवासींचे जैन धर्मांतर
मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांच्या सीमावर्ती भागात बलाई या दलित समाजातील लाखों लोकांनी अलिकडील काळात जैन धर्म स्वीकारला आहे. हे धर्मांतर गेली सुमारे ऐंशी  वर्षे चालू आहे. धर्मांतरीत बलाईंंना धर्मपाल जैन या नावाने ओळखले जाते. याच काळात याच भागात हिंदू खाटिक समाजातील एका घटकाने मोठ्या संख्येने जैन धर्म स्वीकारला आहे. त्यांना वीरवाल जैन या नावाने ओळखले जाते. या दोन्ही समाजात सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक क्रांती झालेली असून आता हे समाज 'पुढारलेले समाज' म्हणून ओळखले जातात.

गुजरातमधील पंचमहल आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील आदिवासी समाजात जैन धर्माचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी या भागातील एक आदिवासी युवक जैन मुनी झाला व त्याने त्याच्या समाजातील व्यसने, वाईट चाली-रिती, भांडणे या विरोधात प्रबोधन सुरू केले. पुढे तो आदिवासी युवक जैन धर्मातील सर्वोच्च ’आचार्य’ झाला. हे आचार्य म्हणजे आचार्य विजय इंद्र दिन्न सुरी. त्यांचे कार्य अजूनही दोन संस्थांतर्फे पुढे चालू आहे. या आदिवासी समाजात आचरण विषयक, आर्थिक आणि शैक्षणिक क्रांती झाली आहे.

तिकडे झारखंड, प. बंगाल, उडिसा, बिहार या भागात सराक नावाचे आदिवासी आहेत. हे प्राचीन काळी जैन होते, पण त्या भागात जैन धर्माचा पाडाव झाल्यावर अनेक जैन कुटुंबे जंगलात निघून गेली. हे सराक लोक त्या प्राचीन जैनांचे वंशज आहेत. हे आदिवासी आहेत. त्यांच्यात अजूनही प्राचीन जैनांच्या कांही चालीरीती दिसून येतात, पण काळाच्या ओघात ते जैन धर्मापासून दूर गेले होते. त्यांचा मुख्य जैन प्रवाहाशी संबध राहीला नव्हता. पण गेल्या साठ  वर्षात जैन साधू व उद्योगपतींनी यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे काम केले आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश या भागातील जैन कार्यकर्ते सराक एरियात जावून सामाजिक काम करत असतात. या कामाचे स्वरूप म्हणजे सराकांच्या ज्या गावात दवाखाना, शाळा, वीज, पाणी, रस्ते वगैरे नाहीत तेथे त्यांची सोय केली जाते. समाजातील गरजू लोकांना आर्थिक मदत केली जाते. युवकांना स्वत:च्या पायावर उभे केले जाते, त्यासाठी मदत केली जाते.

अशाच प्रकारचे काम झारखंड मधील शिखरजी या प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्राच्या आसपासच्या 14 गावात चालू आहे. जैन समाजाने ही 14 गावे पूर्णपणे व्यसनमुक्त आणि शाकाहारी बनवली आहेत, शिवाय या सगळ्या गावात शाळा, दवाखाने, रस्ते, वीज, पाणी यांची सोय केली आहे. पंधरा वर्षांपूर्वी अत्यंत मागासलेली ही गावे आणि तेथील लोक यांच्यात सर्वांगीण सुधारणा होत आहे.

असेच काम मध्य प्रदेश-छत्तीस गढ सीमेवरील नक्षलवादी भागातील आदिवासींमध्ये चिन्मय सागर नावाचे जैन मुनी करत आहेत. त्यांना जंगलवाले बाबा म्हणून ओळ्खले जाते. (हे महाराजांचे नुकतेच निधन झाले).

..........आणि दलित युवक जैन मुनी झाला!

अगदी अलीकडची घटना.. राजस्थानमधील चंदाराम मेघवाल हा दलित युवक मुंबईला काम शोधण्यासाठी आला होता. तो ज्या धर्मशाळेत उतरला होता तेथे एका जैन आचार्यांचे रोज प्रवचन चालू असे. ते ऐकून त्यालाही आपण मुनी व्हावे असे वाटू लागले. त्याने त्या जैन आचार्यांपुढे तशी इच्छा व्यक्त केली. आचार्यांनी त्याला अगोदर जैन धर्माचा अभ्यास करायला सांगितले. त्या युवकास मग अहमदाबाद येथे पाठवण्यात आले. तेथे त्याने दोन वर्षे राहून अभ्यास केला. मग त्याला राजस्थानमधील त्याच्या गावीच जैन मुनी दीक्षा देण्यात आली.

असेच दुसरे उदाहारण आपल्या महाराष्ट्रातील आहे. वाशीमचा विशाल दामोदर हा दलित समाजातील इंजिनीअर. 28 वर्षांचा हा इंजिनीअर हैदराबाद येथे चांगल्या पगारावर नोकरी करत असे. त्याने ही नोकरी सोडून दिली आणि जैन मुनी दीक्षा घेतली.

या प्रकारे जैन धर्म प्रचाराचे काम दोन पातळीवर चालू आहे. पहिले म्हणजे समाज प्रबोधन करून व दूसरे म्हणजे ज्यांना मुनी व्हायाचे आहे त्यांना दीक्षा देवून. हे जैन मुनी कसलाही चमत्कार वगैरे करत नाहीत, किंवा कसलेही आमिष दाखवत नाहीत. जैन आचरण (Jain Code of Conduct) चा प्रचार करणे हाच त्यांचा मुख्य उद्देश असतो.

हेही वाचा:



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Popular Posts