मातंग आणि जैन धर्म लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मातंग आणि जैन धर्म लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

दलित-आदिवासींचे जैन धर्मांतर

-महावीर सांगलीकर

गेल्या सुमारे 80 वर्षांच्या काळात उत्तर भारतात दलित-आदिवासींच्या कांही समूहांनी फार मोठ्या प्रमाणावर जैन धर्म स्वीकारला आहे आणि ही प्रक्रिया आजही चालू आहे, हे फारसे कोणाला माहीत नाही. याचे कारण म्हणजे हे सामुहिक धर्मांतर नाही आणि या  धर्मांतराचा कोठेही गाजावाजा केला जात नाही.

दलित-आदिवासींच्या या धर्मांतराची माहिती घेण्याअगोदर आपणास ही गोष्ट माहीत असणे गरजेचे आहे की भारतात आज जे अनेक दलित-आदिवासी-मागासवर्गीय समाज आहेत, त्यातील अनेक समूह हे एकेकाळी जैन धर्माचे अनुयायी होते. असे समूह भारतभर पसरले आहेत आणि एकेकाळी त्यांचा जैन धर्माशी असलेला संबंध अनेक साहित्यिक, शिलालेखिय व इतर पुरावे देवून सिद्ध करता येतो. त्याविषयी मी वेगळा लेख लिहित आहे. असो.

दलित आदिवासींचे जैन धर्मांतर
मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांच्या सीमावर्ती भागात बलाई या दलित समाजातील लाखों लोकांनी अलिकडील काळात जैन धर्म स्वीकारला आहे. हे धर्मांतर गेली सुमारे ऐंशी  वर्षे चालू आहे. धर्मांतरीत बलाईंंना धर्मपाल जैन या नावाने ओळखले जाते. याच काळात याच भागात हिंदू खाटिक समाजातील एका घटकाने मोठ्या संख्येने जैन धर्म स्वीकारला आहे. त्यांना वीरवाल जैन या नावाने ओळखले जाते. या दोन्ही समाजात सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक क्रांती झालेली असून आता हे समाज 'पुढारलेले समाज' म्हणून ओळखले जातात.

गुजरातमधील पंचमहल आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील आदिवासी समाजात जैन धर्माचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी या भागातील एक आदिवासी युवक जैन मुनी झाला व त्याने त्याच्या समाजातील व्यसने, वाईट चाली-रिती, भांडणे या विरोधात प्रबोधन सुरू केले. पुढे तो आदिवासी युवक जैन धर्मातील सर्वोच्च ’आचार्य’ झाला. हे आचार्य म्हणजे आचार्य विजय इंद्र दिन्न सुरी. त्यांचे कार्य अजूनही दोन संस्थांतर्फे पुढे चालू आहे. या आदिवासी समाजात आचरण विषयक, आर्थिक आणि शैक्षणिक क्रांती झाली आहे.

तिकडे झारखंड, प. बंगाल, उडिसा, बिहार या भागात सराक नावाचे आदिवासी आहेत. हे प्राचीन काळी जैन होते, पण त्या भागात जैन धर्माचा पाडाव झाल्यावर अनेक जैन कुटुंबे जंगलात निघून गेली. हे सराक लोक त्या प्राचीन जैनांचे वंशज आहेत. हे आदिवासी आहेत. त्यांच्यात अजूनही प्राचीन जैनांच्या कांही चालीरीती दिसून येतात, पण काळाच्या ओघात ते जैन धर्मापासून दूर गेले होते. त्यांचा मुख्य जैन प्रवाहाशी संबध राहीला नव्हता. पण गेल्या साठ  वर्षात जैन साधू व उद्योगपतींनी यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे काम केले आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश या भागातील जैन कार्यकर्ते सराक एरियात जावून सामाजिक काम करत असतात. या कामाचे स्वरूप म्हणजे सराकांच्या ज्या गावात दवाखाना, शाळा, वीज, पाणी, रस्ते वगैरे नाहीत तेथे त्यांची सोय केली जाते. समाजातील गरजू लोकांना आर्थिक मदत केली जाते. युवकांना स्वत:च्या पायावर उभे केले जाते, त्यासाठी मदत केली जाते.

अशाच प्रकारचे काम झारखंड मधील शिखरजी या प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्राच्या आसपासच्या 14 गावात चालू आहे. जैन समाजाने ही 14 गावे पूर्णपणे व्यसनमुक्त आणि शाकाहारी बनवली आहेत, शिवाय या सगळ्या गावात शाळा, दवाखाने, रस्ते, वीज, पाणी यांची सोय केली आहे. पंधरा वर्षांपूर्वी अत्यंत मागासलेली ही गावे आणि तेथील लोक यांच्यात सर्वांगीण सुधारणा होत आहे.

असेच काम मध्य प्रदेश-छत्तीस गढ सीमेवरील नक्षलवादी भागातील आदिवासींमध्ये चिन्मय सागर नावाचे जैन मुनी करत आहेत. त्यांना जंगलवाले बाबा म्हणून ओळ्खले जाते. (हे महाराजांचे नुकतेच निधन झाले).

..........आणि दलित युवक जैन मुनी झाला!

अगदी अलीकडची घटना.. राजस्थानमधील चंदाराम मेघवाल हा दलित युवक मुंबईला काम शोधण्यासाठी आला होता. तो ज्या धर्मशाळेत उतरला होता तेथे एका जैन आचार्यांचे रोज प्रवचन चालू असे. ते ऐकून त्यालाही आपण मुनी व्हावे असे वाटू लागले. त्याने त्या जैन आचार्यांपुढे तशी इच्छा व्यक्त केली. आचार्यांनी त्याला अगोदर जैन धर्माचा अभ्यास करायला सांगितले. त्या युवकास मग अहमदाबाद येथे पाठवण्यात आले. तेथे त्याने दोन वर्षे राहून अभ्यास केला. मग त्याला राजस्थानमधील त्याच्या गावीच जैन मुनी दीक्षा देण्यात आली.

असेच दुसरे उदाहारण आपल्या महाराष्ट्रातील आहे. वाशीमचा विशाल दामोदर हा दलित समाजातील इंजिनीअर. 28 वर्षांचा हा इंजिनीअर हैदराबाद येथे चांगल्या पगारावर नोकरी करत असे. त्याने ही नोकरी सोडून दिली आणि जैन मुनी दीक्षा घेतली.

या प्रकारे जैन धर्म प्रचाराचे काम दोन पातळीवर चालू आहे. पहिले म्हणजे समाज प्रबोधन करून व दूसरे म्हणजे ज्यांना मुनी व्हायाचे आहे त्यांना दीक्षा देवून. हे जैन मुनी कसलाही चमत्कार वगैरे करत नाहीत, किंवा कसलेही आमिष दाखवत नाहीत. जैन आचरण (Jain Code of Conduct) चा प्रचार करणे हाच त्यांचा मुख्य उद्देश असतो.

हेही वाचा:



सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

घरवापसी चळवळीला दोन वर्षे झाली.... विठ्ठल साठे.


मातंग वंश हा जैन परंपरेतील वंश आहे. प्राचीन काळापासून आहे. ही अत्यंत आश्चर्यकारक बाब मातंग वंश आणि प्रस्थापित जैन यांना सांगावी, सबंध भारतात असलेल्या मातंग वंशास पुन्हा त्याच्या मूळ घरी आणावं, मातंगवंशातील लोकांना जैन परंपरा समजावून द्यावी, जैन धर्माचा प्रचार आणि प्रसार करावा असे वाटल्यामुळे एक संघटन उभे राहिले -जैन विचार मंच.


मातंग आणि जैन ? हा हिमालयासारखा प्रश्न ! केवळ सहज सांगितले तरी प्रचंड धक्का बसत होता. आकाशात उंच न्यावे आणि खाली सोडून द्यावे. तसं काही तरी ! ना मातंग विश्वास ठेवणार ना जैन ! कारण सांप्रतचा मातंग समाज ज्या अवस्थेत दिसून येतो. त्याच्याकडे बघीतल्यावर त्याला जैन म्हणणे म्हणजे आपण नुकतेच वेड्याच्या इस्पितळातून बाहेर पडलो आहोत. याचा पुरावा देण्यासारखे ! परंतु सत्य ते सत्यच ! जैन आगम ग्रंथाच्या अनेक पानावर मातंग आढळून येतो. ते ग्रंथ काल परवा लिहिलेले नव्हते. शेकडो वर्षांपूर्वी लिहिले होते. आणि कुणी तरी फुटकळ संशोधकांनी लिहिले नव्हते .किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी लिहिले नव्हते. अतिशय उच्च कोटींच्या विद्वानांनी ते लिहिले होते/लिहिले आहेत. आचार्य, मुनी या पदाला पोहोचलेल्यांनी लिहिले आहेत ! ओढूनताणून मातंग वंशाला मोठे करण्यासाठी सुद्धा लिहिले नाहीत. हे स्वच्छ सत्य आहे. मग हे सत्य मातंग वंश आणि जैन यांच्या पर्यंत पोहोचले पाहिजे असा रास्त विचार मनात आला. त्या विचाराने ' जैन विचार मंच ' ची स्थापना करण्यात आली.या मंचाच्या कार्यात प्रस्थापित जैन आणि मातंग वंशातील लोक सामील झाले. जैन विचार मंचाच्यावतीने एक पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. परंतु ही चळवळ फारसे महत्त्व द्यावे अशी नाही असे समजून किरकोळ प्रसिद्धीच्या पलीकडे काही होऊ शकले नाही. आम्ही सुद्धा फारसे लक्ष दिले नाही. कारण प्रसिद्धी ही खूप भयानक बाब आहे. तिचा हव्यास धरला की मग मूळ कार्य बाजूला फेकले जाण्याची शक्यता जास्त असते. एक प्रकारचे व्यसनच असते ते ! असो!
चळवळ सुरू केली आणि कार्यक्रम आयोजित केले:-

१) पुण्यातील गुरूवार पेठेतील जैन मंदिरात मातंग वंशातील महिलांनी आरती केली.
२) तळेगांव येथील पार्श्वप्रज्ञालय जैन मंदिरास भेट.
३) आचार्य विश्वकल्याण विजयसूरीश्वरजी यांच्याशी चर्चा.
४) भगवान महावीर यांच्या जयंती उत्सवात सामील.
५) आगमवेत्ता 'आत्मा 'साध्वी वैभवश्री यांची भेट.
६) महावीर प्रतिष्ठान येथे प्रारंभ केलेल्या चातुर्मास मिरवणुकीत सामील.
७) आदरणीय साध्वी वैभवश्री यांचे मातंग वंशावर प्रवचन. विषय -समण संस्कृती और मातंग वंश.मातंग वंश समण संस्कृती का अभिन्न अंग है.
८) महावीर प्रतिष्ठान येथे माझे भाषण. मातंग वंश हा कसा जैन आहे. याविषयी!
९) आदरणीय पुलकसागर महाराज यांच्या भेटी व चर्चा.
१०) जैन विचार मंच मधील जैन बांधवांचा सत्कार.
११) सातारा येथे मंदिर निर्माण कार्य.
१२) भगवान श्री सुपार्श्वनाथ अहिंसा चँरेटेबल ट्रस्ट. सातारा. ची स्थापना.
१३) जैन धर्मात मातंगवंशातील परिवारांचे स्थितीकरण प्रारंभ.गांधी भवन येथे स्थितीकरण कार्यक्रम.
१४) भगवान ऋषभनाथ यांचा आहार समारंभ.(अक्षय तृतीया )
१५) भगवान महावीर यांची जयंती ( जन्म कल्याणक.) उत्साहात साजरी.
१६) भारतातील महान विद्वान आदरणीय डॉ. प्रियकर जैन यांची वेरुळ येथे भेट.
१७) भगवान महावीर निर्वाण कल्याणक.
१८) सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, नांदेड, मुंबई, रायगड, या जिल्ह्यात जैन विचार मंचाच्या शाखा स्थापन.
१९) शिबीर आयोजित.
२०) रक्तदान शिबिरात रक्तदान.
२१) कोल्हापूर येथे आयोजित पंचकल्याणकमधे सहभाग.
२२) सातारा येथे आयोजित दशलक्षणपर्वात सहभाग.
२३) महावीर प्रतिष्ठान येथे जैन बांधवाचे शंका समाधान कार्यक्रम.
२४) आता पर्यंत १७८परिवारांचे स्थितीकरण.
२५) २०१९ चा दसरा 'अरिहंत वंदन दिन 'म्हणून साजरा करण्यात आला.
२६) भारतीय स्तरावरील श्री दिगंबर जैन आर्हत धर्मपीठ. राजस्थान. या संस्थेवर माझी उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती.
२७) दर रविवारी जैन धर्मासंबंधी अभ्यासवर्ग.

आणखी बरेच कार्यक्रम राबविण्यात आले. सर्व नमूद केले तर यादी खूप मोठी होईल.


आमची चळवळ क्रांती घडवित आहे. एका दबलेल्या, पिचलेल्या, दूर लोटलेल्या समाजाला त्याची खरी ओळख करून देत आहे. जो मूळातच प्रतिष्ठित होता आणि श्रेष्ठ परंपरेतील होता.त्याला पुन्हा ती प्रतिष्ठा आणि श्रेष्ठत्व मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे.काम कठीण आहे. एका वेगळ्या संस्कारात पिढ्यानपिढ्या व्यतित झालेल्या समाजाला एकदम विरुद्ध दिशेला नेणे सोपं नव्हतं.पण आम्हाला यात अशक्य काही वाटत नाही.

दोन वर्षात १७८परिवारांनी घरवापसी केली. ही खूप खूप उत्साहवर्धक घटना आहे. 'जय जिनेंद्र ' कधीही ऐकलेले नसलेल्या समाजात 'जय जिनेंद्र ' अभिमानाने म्हटलं जातं. लोक सकाळी आणि संध्याकाळी णमोकार मंत्र म्हणतात. मांसाहारी घराशी सोयरीक करीत नाहीत. व्यसनी घराशी संबंध ठेवत नाहीत. वेळ मिळेल तसे जैन मंदिरात जातात. दर्शन घेतात.प्रवचने ऐकतात. मुले शाळेत दाखल करताना धर्म -जैन लिहितात. जात-जैन लिहितात. आणि या सर्वापेक्षा ताण म्हणजे ते मागासवर्गीय समाजाला मिळणाऱ्या सवलतींचा अर्ज सादर करीत नाहीत. अर्थात आम्ही त्यांना हे सर्व करणे शक्य असेल तरच घरवापसी करा. असे प्रामाणिकपणे सांगितले आहे. हे करणे शक्य नसेल तर घरवापसीची गरज नाही. हे सुद्धा स्पष्ट केलेले आहे. करतोच. कारण ही स्टंटबाजी नाही! प्रसिद्धीसाठी केलेला बनाव नाही! हे अत्यंत पवित्र कार्य आहे आणि ते तितक्याच पवित्र भावनेने केले पाहिजे. याची आम्हा सर्वांना जाण आहे आणि भान सुद्धा आहे.

सूर्य कुणी विकत घेऊ शकत नाही. पण त्याच्या प्रकाशात जाऊन उभं तर रहाता येईल की नाही ? आणि एकदा प्रकाशाची मैत्री झाली की मग अंधाराच्या वेदनांचे स्मरण होत नाही असा आमचा विश्वास आहे. या दोन वर्षात प्रकाश वाटेवर पडलेली पावलं मुक्तीच्या मंदिराकडे नेत आहेत !

-विठ्ठल साठे.
उपाध्यक्ष, श्री दिगंबर जैन आर्हत धर्मपीठ, राजस्थान.
निमंत्रक, जैन विचार मंच.
अध्यक्ष, भगवान श्री सुपार्श्वनाथ अहिंसा चँरेटेबल ट्रस्ट, सातारा

हेही वाचा:

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१९

मातंग वंश आणि जैन परंपरा

-महावीर सांगलीकर
jainway@gmail.com 

मातंग समाजाला फार प्राचीन इतिहास आहे., पण त्यांच्या इतिहासावर फारसे संशोधन झालेले नाही. जे झाले आहे ते वैदिक आणि बौद्ध परंपरेतील साहित्यावर आधारीत आहे. अर्थातच, मातंगांचा  इतिहास लिहिताना जैन साहित्यातील मातंगांची माहिती फारशी कोणी विचारात घेतली नाही. 

जैन साहित्यात मातंगांचे  उल्लेख वारंवार येतात. त्यानुसार मातंग वंशाचा संबध सरळ सरळ जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभनाथ उर्फ आदिनाथ यांच्यापर्यंत जातो. अर्थातच हा संबंध इतिहासपूर्व काळातील आहे.

ऋषभनाथ  हे मानवी संस्कृतीचे निर्माते होते. त्यांनी मानवाला शेती, शस्त्रविद्या, लिखाण आणि उपजीविकेचे अनेक उद्योग शिकवले. जैन साहित्य आणि हिंदू पुराण साहित्य या दोन्हींत ऋषभनाथांना एकमुखाने सर्व क्षत्रियांचे पूर्वज आणि सर्व क्षत्रियांकडून पूजित मानले आहे.

या ऋषभनाथांना  नमी आणि विनमी असे दोन नातू होते. विनमीला मातंग नावाचा मुलगा होता. त्याच्यापासून मातंग वंशाची सुरवात झाली. मातंगवंशीयांना वेगवेगळ्या विद्या अवगत होत्या, म्हणून त्यांना विद्याधर असेही म्हंटले जाई. पुढे मातंग वंशाच्या सात शाखा झाल्या. त्यातील एक शाखा म्हणजे वार्क्ष मुलिक वंश होय. या वार्क्ष मुलिक वंशाची  खूण सापाचे चिन्ह असलेले दागिने ही होती.  हाच वंश पुढे नागवंश म्हणून ओळखला जावू लागला.  या वार्क्ष मूलक उर्फ नाग वंशात पुढे जैन धर्माचे सातवे तीर्थंकर सुपार्श्वनाथ हे झाले. जैन परंपरेत सर्व चोवीस तीर्थंकरांना वेगवेगळी चिन्हे आहेत. यातील अपवाद वगळता बहुतेक चिन्हे ही प्राण्यांची आहेत. सुपार्श्वनाथांचे चिन्ह स्वस्तिक हे आहे, पण त्याचबरोबर  त्यांचे दुसरे चिन्ह फणाधारी साप  हे आहे. यातील स्वस्तिक हे चिन्ह सिंधू संस्कृतीशी संबंधित आहे, तर फणाधारी साप हे चिन्ह नागवंशाशी संबंधीत आहे.


विशेष म्हणजे सुपार्श्वनाथ यांचा यक्ष मातंग आहे, त्याच प्रमाणे जैन धर्माचे शेवटचे तीर्थंकर महावीर यांचा यक्षही मातंग आहे. अर्थातच मातंग वंशाची सुरवात ज्याच्यापासून झाली तो विनमी पुत्र मातंग, सुपार्श्वनाथ यांचा यक्ष मातंग आणि महावीर यांचा यक्ष मातंग असे एकूण तीन महत्वाचे उल्लेख जैन साहित्यात दिसून येतात. 

जैन साहित्यातील मातंगांच्या वरील उल्लेखांवरून  असा निष्कर्ष निघतो की नागवंश ही मातंग वंशाची एक शाखा आहे. म्हणजेच नागवंशी हेही मूळचे मातंगवंशीच आहेत. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की आज कांही लोक नागवंशाचा संबंध बौद्ध धर्माशी जोडत असले तरी नागवंशात प्रामुख्याने जैन धर्मच होता. इतकेच नाही तर जैन धर्माचे 24 पैकी किमान तीन तीर्थंकर हे नागवंशी होते, ते म्हणजे सुपार्श्वनाथ (7वे तीर्थंकर), पार्श्वनाथ (23वे तीर्थंकर) आणि महावीर (24वे तीर्थंकर). याउलट बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध हे कांही नागवंशी नव्हते, कारण ते ज्या कुळात जन्माला आले ते शाक्य कुळ हे कांही नागवंशी नव्हते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महावीर ज्या कुळात जन्माला आले ते नाथ कुळ आणि  महावीरांच्या आईचे लिच्छवी कुळ ही दोन्हीही कुळे नागवंशी होती. महावीरांच्या चार मावश्यांचे लग्न ज्या राजांशी झाले तेही नागवंशी होते. या सगळ्या कुळांमध्ये परंपरेने  जैन धर्म होताच, शिवाय हे राजे पुढे महावीरांचे शिष्य झाले. महावीरांचा  एक काका (मावशीचा  पती)  प्रसेनजीत हा  कांही काळ गौतम बुद्धांचा शिष्य झाला होता, पण शाक्यांनी प्रसेनजिताची घोर फसवणूक केल्याने  तो गौतम बुद्धांच्या पासून  दूर झाला आणि पुन्हा आपल्या मूळ धर्माकडे वळला.

मातंग जैन मुनी  
जैन धर्मात मुनी परंपरेला फार महत्व आहे. जैन साहित्यात प्राचीन काळातील अनेक जैन मुनींची माहिती अगदी त्यांचा जन्म कोणत्या कुळात अथवा समाजात झाला यासह येते.  या संदर्भात अभ्यास केल्यावर असे दिसून येते की आज जशी जैन मुनी दीक्षा घ्यायची मुभा कोणत्याही जातीच्या व्यक्तीला आहे, तशीच ती प्राचीन काळीही होती. जैन साहित्यातील उल्लेखानुसार सगळ्या वर्णांचे आणि त्या काळातील कोणत्याही वंशाचे/ समाजाचे लोक जैन मुनीदीक्षा घेत असत.

मातंग लोकही याला अपवाद नव्हते. मातंग व्यक्तीने जैन मुनी दीक्षा घेतल्याची व पुढे अगदी 'आचार्य' झाल्याची बरीच उदाहरणे आहेत. हरीकेशी, चित्त, संभूत, मेतार्य ही त्यांच्यापैकी कांही नावे.

यातील चित्त आणि संभूत हे दोघे भाऊ होते. त्यांची माहिती उत्तराध्ययन सूत्र या प्राचीन जैन ग्रंथात येते. मातंग समाजात जन्मलेले हे दोघे भाऊ जैन मुनी झाल्यावर एका यज्ञाच्या ठिकाणी जातात आणि त्या याज्ञिक ब्राम्हणांना यज्ञ करणे, त्यात बळी देणे कसे चुकीचे आहे सांगतात. त्यांचे म्हणणे पटून ते ब्राम्हण यज्ञ-याग वगैरे सोडून देतात आणि महावीरांचे शिष्य बनतात, अशा स्वरूपाची एक सविस्तर कथा या ग्रंथात आली आहे.  याज्ञिक ब्राम्हणांना मातंग मुनींनी उपदेश करणे आणि त्यांचे मतपरिवर्तन करणे ही क्रांतीकारक घटना वाटते.

उत्तराध्ययन सूत्र हा ग्रंथ फार महत्वाचा आहे, कारण तो प्राचीन तर आहेच, पण त्याच बरोबर यात वर्धमान महावीर यांच्या आयुष्यातील शेवटच्या काळातील उपदेशांचे सार आहे.

जैन रामायण 
 वाल्मिकी रामायणात हनुमान, वाली, सुग्रीव, नल, नील, अंगद  यांना वानर, अस्वल वगैरे  मानले आहे. कांही ठिकाणी ते मातंग होते असेही म्हंटले आहे. पण जैन रामायणात त्यांना विद्याधर आणि मानवच मानले आहे. ते मानव असले तरी त्यांचे पूर्वज ज्या बेटावर रहात तेथे मोठ्या प्रमाणात वानर होते, त्यामुळे या विद्याधरांनी आपल्या ध्वजावर वानर हे चिन्ह वापरण्यास सुरवात केली असे स्पष्टीकरण जैन रामायण देते. मातंगाना विविध विद्या अवगत असल्याने त्यांना विद्याधर म्हणून ओळखले जात असे हे मी या लेखाच्या सुरवातीस म्हंटलेच आहे.

वाल्मिकी रामायणात हनुमानाला रामाचा दास दाखवले आहे, याउलट जैन रामायणात हनुमान हा विद्याधर आणि राजा असल्याचे आणि रामाचा मदतकर्ता मित्र असल्याचे दाखवले आहे.

जैन धर्म मोक्ष मानतो. मोक्ष हा केवळ मानवासच मिळतो असे जैन तत्वज्ञान सांगते. जैन धर्मात हनुमान, सुग्रीव, नल, नील वगैरे मोक्षास गेले असे मानले आहे. यावरूनही ते मानवच होते असे दिसते.

भगवान महावीरांच्या काळात राजा श्रेणिक याच्या राज्यात मातंग नावाचा समाज होता असा उल्लेख अभयकुमार आणि मातंगपती यांच्या कथेत येतो.  या कथेतील अभयकुमार हा श्रेणिकाचा मुलगा तर मातंगपती हा मातंग समाजाचा प्रमुख होता. मातंगपतीला अनेक विद्या अवगत होत्या असाही उल्लेख येतो. यावरून मातंग हे विद्याधर होते हे पुन्हा एकदा दिसून येते.

मातंग वंश आणि जैन धर्म या विषयावर मी येथे थोडक्यात माहिती दिली आहे.  यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे, आणि ते मुख्य करून मातंग संशोधकांनी केले पाहिजे असे मला वाटते.

संदर्भ:
प्राकृत साहित्य का इतिहास: डॉक्टर जगदीश चंद्र जैन
उत्तराध्ययन सूत्र , जैन सूत्र ग्रंथ
ऋषिभाषित
महापुराण: आचार्य जिनसेन
जैन रामायण: आचार्य विमलसुरी
जैन धर्म का मौलिक इतिहास:  आचार्य हस्तीमलजी महाराज
भारतवर्ष नामकरण: डॉक्टर जिनेन्द्र भोमाज

हेही वाचा:

व्हिडिओ




Popular Posts